Tuesday, October 24, 2017

Jungles of Goa - part 2

(Continued from previous part)
३-ऑक्टोबर
परत एकदा सकाळी उठून Vernal Hanging Parrots बघायला बाहेर पडलो ६:३० वाजता. आज थोडे फोटोस काढता आले त्यांचे आणि बरोबर एक हॉर्नबिल चा सुद्धा.
परत एकदा ८:३० हि ब्रेकफास्ट ची वेळ ठरलेली होती आणि ९ वाजता हॉटेल सोडायचे होते. आज थोडे जास्त अंतर जावे लागणार होते. चोरला घाट पार करून म्हादई येथील अभयारण्यात जायचे होते. पण आज चालायचे अंतर तसे जास्त नव्हते आणि ओहोळ किंवा नाले पार करून जायचे नव्हते.
८:३० ला ब्रेकफास्ट तर झाला पण अचानक गुरुजींनी (युवराज) एक टारांटूला सापडल्याची घोषणा केली आणि समस्त फोटोग्राफर मंडळींची धावपळ सुरु झाली, त्यात तो कोळी जरा जास्तच चपळ असल्याने शब्दशः धावपळ झाली. मग परत एकदा वेगवेगळ्या पोझेस मिळवणे चालू झाले, मंडळींनी जमिनीवर लोळण घेत फोटो-सेशन चालू केले.



बहुतेक हा टारांटूला सकाळीच मिळाला होता, त्यामुळे organizers ना ह्या होणाऱ्या उशिराची कल्पना होती, आम्हाला आपलं उगीचच असं वाटत होत कि आम्ही उशीर करतोय निघायला. शेवटी एकदाचे आम्ही १० च्या सुमारास बाहेर पडलो. घाट रस्ता बघून दीपाने लगेचच avomine घेऊन टाकली, आणि ते बराच झालं कारण बहुतेक सर्वच रस्ता तसाच होता. साधारण १२ च्या सुमारास आम्ही गंतव्य स्थानी पोहोचलो.
आज आमचे ग्रह अगदी अनुकूल होते म्हणायचे. गजाननने (आमचा लोकल गाईड)  अगदी थोड्याच वेळात २ मलबार पिट वायपर शोधले. एक orange morph आणि दुसरा brown morph. आमच्या फोटो टूर पार्टीला आजून काय हवे? २ साप एकदम, म्हणजे मेजवानीच कि.


पुढचा साधारण तासभर तरी ह्यातच गेला मग. सगळ्यांचे मिळून किमान हजार-एक तरी फोटो झाले असतील (अतिशयोक्ती नाही, खरंच ह्याहून जास्तच झाले असतील, पण कमी नाही). सगळ्यांना आपापल्या सोशल मीडिया वर शेअर करायला भरपूर फोटोस मिळाले. तिथून पाच मिनिट्स अंतरावर मग एक धबधबा बघायला चालत गेलो. अर्थात धबधबा खूप लांब होता पण त्या कड्यावरून दिसणारा view छान होता.

तिथेच एक खूपच सुंदर shiny अशा निळ्या रंगाचे एक फुलपाखरू दिसले, अर्थात त्याची गती इतकी होती कि फोटो काढणे कोणालाच शक्य झाले नाही. त्याचे नाव पॅरिस पिकॉक असे कळले, नंतर इंटरनेट वर त्याची छायाचित्रे बघून झाली अर्थातच. हे सगळे होईपर्यंत २ वाजून गेले होते, पोटात कावळे ओरडू लागले होते. अर्थात आज लंच साठी परत रिसॉर्ट वर जायचे नव्हते. जवळच (साधारण २-३ कमी) अंतरावर एका रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि परत एकदा मंडळींनी माशांवर ताव मारला.
त्या रेस्टॉरंट चे एक खासगी रिसॉर्ट होते मागेच, तिथे तासभर विश्रांती घेण्याचा प्लॅन होता. म्हणजे तशी तिथे बसायला जागा होती, पण मॅक्रो फोटोग्राफी वाल्यांच्या साठी काही संधी तर होत्याच. एक bright orange रंगाचे मश्रुम बघितले तिथे आणि एक किडा (त्याचे नाव हिटलर बग).


हवा अचानक खूप पावसाळी झाली होती, मग आम्ही थोडा वेळ तिथेच बसून विश्रांती घ्यायचे ठरवले. पण गजानन कुठला शांत बसतोय. त्याने पाचच मिनिटात सूचना दिली कि एक हरणटोळ (Green Vine Snake) मिळालाय.

मग धावतच तिथे निघालो, ५-१० फोटो घेतले असतील-नसतील तेवढ्यात पाऊसाने अचानक जोर धरला. इतका कि, तिथे थांबणे शक्यच झाले नाही, मग गुपचूप आम्ही बस कडे धावलो (झाडांचा आडोसा घेऊन). काही जण चतुराईने छत्री बरोबर घेऊन आले होते त्यामुळे त्यांना धावावे लागले नाही. पावसाचा जोर बघून मग लगेचच परत जायचे ठरले. परतीच्या प्रवासात घाटात एका ठिकाणी landscape फोटो साठी थांबलो, धुक्यामुळे व्हिसिबिलीटी खूप कमी होती पण काढला तसाच फोटो.

साधारण ५:३० च्या सुमारास परत आलो रिसॉर्ट वर. चहाची वेळ तर झालीच होती त्यामुळे रूमवर न जाताच तिथेच विसावलो.
पण दिवस अजून संपला नव्हता. रिसॉर्ट च्या एक्स्पर्ट गाईड्स नि एक अजून साप शोधला होता तिथे. लगेच सर्वांचा थकवा दूर पळून गेला. साप पाळायच्या आत फोटो साठी कॅमेरे तयार ...
हा Forsten's cat snake होता. तसा विषारी नव्हता पण आकाराने आधी बघितलेल्या सापांपेक्षा खूप लांब होता.
ह्या चित्रात तुम्हाला थोडा अंदाज येईल कि किती जवळून हे फोटो सेशन चालू होतं.

ह्या नंतर संध्याकाळी थोडा वेळ होता त्यामुळे मग अजून एक slideshow बघायचे ठरले. आज गुरुजींनी किडे, पक्षी वगैरे विषय घेऊन त्याच्या अनुषंगाने जास्त माहिती (चित्रांसहित) सांगितली. फोटो काढताना काय ध्यानात  ठेवायला हवे वगैरे.
मधे डिनर ब्रेक घेऊन slideshow परत चालू झाला. ११ वाजेपर्यंत अगदी ज्ञानाचा ओव्हरडोस झाला. उद्या शेवटचा दिवस, त्यामुळे पक्षी बघायला सकाळी उठणे भागच होते, तेव्हा परत एकदा माझा रात्रीचा ट्रेल कॅन्सल.
आणि आज बॅग सुद्धा भरायला लागणार होती, २-३ दिवसात सगळे सामान अस्ताव्यस्त झालेच होते, ते आवरून ठेवावे लागणार होते, म्हणजे उद्या घाई करावी लागणार नाही. आणि हो, ह्या शिवाय उद्या दुपारी १२ वाजताच रिसॉर्ट सोडायचा असल्याने ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही लवकर  करावे लागणार होते.

४-ऑक्टोबर
परत एकदा सकाळी लवकर उठून birding साठी बाहेर पडलो. पण आज vernal handing parrot आमच्यावर बऱ्यापैकी मेहेरबान होते. थोडे जास्त संख्येने ते उपस्थित होते त्यामुळे बऱ्यापैकी फोटोस मिळाले आज.



आज ब्रेकफास्ट  ७ वाजताच होता आणि  बाहेरचा ट्रेल ऑपशनल होतामग परत एकदा रिसॉर्ट मधेच पक्षांच्या मागे लागलो. त्यामुळे आज इतर थोडे फोटोस देखील मिळाले.



जेवण आज ११ वाजता  होते. त्यामुळे मग फोटोस  आवरते घेतले आणि बॅगा आवरून वेळेत तयार झालो. तेवढ्या वेळातही युवराजने माळरानावर एक ट्रेल करून काही special फोटोस मिळवलेच. जे ३-४ जण त्या ट्रेल वर गेले त्यांना मिळाले एक ड्रॉसेरा इंडिका नावाचे कीटकभक्षी झाड, अगदी त्याच्या पकडलेल्या भक्षासहित.
अरे हो, पण आजचा दिवस अजून दोन साप बघण्याचा होता. त्यातला एक Buff striped keelback किंवा नानेटी आणि दुसरा आवारात सापडलेला ताजा-ताजा hump-nosed pit viper. मंडळी बाहेरच्या ट्रेल ला निघण्या पूर्वी आम्ही ह्या दोन सापांचेही खूप फोटो काढले.


जेवण आटोपून बरोबर १२ वाजता आम्ही रिसॉर्ट सोडला. आमच्यापैकी काही जण परतीचा प्रवास ट्रेन ने करणार होते, त्यामुळे आधी त्यांना स्टेशन वर सोडून मग आम्ही एअरपोर्ट ला गेलो आणि सुरु झाला ४ दिवसातला सर्वात कंटाळवाणा भाग. आमचे विमान होते ६:४५ चे आणि आम्ही विमानतळावर पोहोचलो २ वाजता. एअर-इंडिया ने तर ४ वाजेपर्यंत बोर्डिंग पास सुद्धा द्यायला नकार दिला.  कसाबसा वेळ काढला तिथे, त्यात विमान पाऊण तास उशिरा सुटले. घरी येई-पर्यंत १० वाजून गेले होते.
प्रवास संपला खरा पण खूप-सगळ्या मस्त आठवणी देऊन गेला. जाताना थोडी धाकधुक होती कि आपल्याला अशी ट्रिप आवडेल कि नाही. पण हा अनुभव वेगळाच होता. त्यामुळे पुढच्या वर्षी परत सुद्धा अशीच ट्रिप करायला हरकत नाही अर्थात असा ग्रुप बरोबर असेल तर.
शेवटी थोडं आमच्या ग्रुप विषयी.
मी आणि दीपा धरून आम्ही ११ जण होतो ह्या ट्रिप ला. मकरंद आणि युवराज म्हणजे विहंग चे organizers आणि निसर्ग ह्या विषयातले तज्ज्ञ. अन्वय आणि अविनाश दोघे पुण्याहून आले होते. हे ग्रुप मधले सर्वात तरुण सदस्य. अन्वय फिनान्स क्षेत्रातला आणि अविनाश IT मधला. त्यानंतर इस्माईल आणि मारिया सामीवाला हे विहंग चे एक जुने-जाणते मेंबर. इस्माईल भाई फार्मा क्षेत्रातले आणि मारिया गृहिणी. मग नैनेश अमीन हे वकील मित्र आणि ग्रुप चे सर्वात अनुभवी मेंबर म्हणजे युधी काका (युधिष्ठीर वैद्य). अर्थात त्याच्या उत्साहाकडे आणि मूर्तीकडे बघून ते आमच्यापेक्षा तरुणच वाटत होते खरेतर. त्याशिवाय कांचन देशमुख हि पनवेल स्थित जाणती फोटोग्राफर. केवळ फोटोग्राफी करता बिचारी आपल्या मुलीला घरी सोडून आली होती.
आमचा विहंग चा ग्रुप

Nature's Nest च्या गाईडस सोबत
                                                                               

Tuesday, October 17, 2017

Travelogue - Jungles of Goa (October 2017)

गोव्यातली जंगले - विहंग ट्रॅव्हल्स बरोबर 

{ह्या लेखातील कुठल्याही चित्रावर mouse क्लिक करून तुम्ही मोठे चित्र पाहू शकाल}

गोवा हे नाव घेता-क्षणी आपल्या डोळ्या समोर येतात तिथले समुद्रकिनारे. पण ही विहंग ची ट्रिप वेगळीच. ह्याचे नावच मुळी "Jungles of Goa". मकरंद ने जेव्हा ह्या आउटिंग विषयी सांगितले तेव्हाच थोडे कुतूहल होते की नक्की कशी असेल ही ट्रिप.

बर्‍याच मित्रांना तर गोव्यात जंगलं आहेत हेच खरं वाटत नव्हतं.

आधी मी साकेत ला विचारले पण त्याला सुट्टी नव्हती, पण ह्या वेळी दीपा तयार झाली यायला. मग मी, जिथे आम्ही राहणार होतो त्या रिसॉर्ट बद्दल थोडी माहिती internet वर बघितली. अगदी भिन्न प्रतिक्रिया होत्या लोकांच्या. काहींना तिथलं वातावरण आणि जेवण आवडलं होत तर काहींनी तो रिसॉर्ट अगदीच बेसिक असल्याचं म्हटलं होत. पण आवारात पक्षी खूप असतात असा सर्वांचाच अभिप्राय होता. चला म्हणजे काही नाही तर निदान बर्ड फोटोग्राफी तरी करता येईल असा अंदाज आला. जातांना ट्रेन आणि येतांना विमान असा बेत ठरलेला होता, त्याप्रमाणे ट्रेन/ फ्लाईट बुकिंग हि करून झालं.

जसजसा जाण्याचा दिवस जवळ येऊ लागला तेव्हा पहिले एक whatsapp ग्रूप तयार केला युवराज नि आणि त्यावर लोकांनी आपल्या ट्रिप wishlist मांडायला सुरूवात केली. बहुतेकांची अपेक्षा होती वेगवेगळे साप बघण्याची. ते ऐकून दीपा चा उत्साह थोडा कमी झाल्यासारखा वाटला. माझं म्हणाल तर, आपण आपली नवीन आणलेली लेन्स आणि कॅमेरा ह्यांचा सदुपयोग व्हावा एवढी माफक इच्छा होती. मग आपल्याला  ही थोडी माहिती असावी म्हणून मी सापांचे एक माहिती पुस्तक  घेऊन आलो (पूर्ण वाचलं नाही, पण वरवर चाळून झालं एक-दोनदा.).

२ दिवस आधी, मग बॅग कुठली घ्यायची ह्याची चर्चा सुरू झाली.  शूज अपरिहार्य होते (रस्त्यातल्या सापांपासून रक्षणासाठी - ह्यात मानसिक समाधानच जास्त, कारण साप तर बुटाच्या वर देखील चावू शकतो हा विचार करून झाला होता), तसेच पावसा करता छत्री किवा पोन्चो ही हवाच. अर्थात जंगल फिरायचे असल्याने कपडे ही तसेच हवेत, जुजबी औषधं लागतील, आणि हो - जंगलात चालायला टॉर्च/हेडलॅम्प हवेतच. एक ना दोन, अशा सतराशे साठ गोष्टी यादीत टाकून झाल्या.

ह्याहून मोठी चर्चा कॅमेरा बॅग कुठली घ्यायची आणि नक्की काय-काय न्यायचे (म्हणजे कुठली लेन्सेस, external flash घ्यायचा की नाही - कारण त्याच्याबरोबर मग बॅटरीस लागणार, ट्रायपॉड घ्यायचा की नाही, लेन्स हूड पण घ्यावे का?, इत्यादी ) ? त्यात परत point-n-shoot कॅमेरा जुना झालाय असं लक्षात आलं. आणि दीपा पण बरोबर येणार त्यामुळे तिच्यासाठी एक नवीन point-n-shoot घ्यायचा निर्णय झाला. मग त्या प्रित्यर्थ एक फेरी DN Road ला झाली. मोठी कॅमेरा बॅग ही चेक-इन बॅग म्हणून चालेल असं  समजल्यावर मग मोठी कॅमेरा बॅग नक्की झाली....  हुश्श !

हि झाली सामानाची तयारी. दीपा ने तर शारीरिक/मानसिक दोन्ही स्तरांवर तयारी केली. आधीच्या लिगामेंट ऑपेरेशन मुळे मग ट्रेक साठी स्पेशल ट्रेनिंग झालं. साप बघण्याची मानसिक तयारीही झाली.

बघता-बघता जायचा दिवस उजाडला (म्हणजे तशी आमची ट्रेन रात्रीची होती, पण तरीही दिवस उजाडलाच). आता स्टेशन ला सोडायला घरचाच ड्राइवर होता त्यामुळे तो प्रश्न सुटला, पण नेमका त्या दिवशी दसरा, म्हणजे दुर्गा विसर्जनाची गर्दी. मग साकेत ला स्टेशन पासून जरा लांबच थांबवायला सांगून पुढे चालत स्टेशन गाठलं. गाडी ठाण्याला वेळेत  आली पण दुसर्या दिवशी सकाळी मडगाव ला पोहोचायला दीड तास उशीर. आमच्या ग्रूप मधले दोन जण पुण्याहून येणारे होते, त्यांची गाडी सकाळी लवकर पोहोचलेली, त्यामुळे त्यांना स्टेशन वरच टाइम पास करावा लागला काही तास. ट्रेन मधे झोप व न्याहारी व्यवस्थित झालेली असल्याने तशी चिंता नव्हती.

बाहेर येऊन मिनी-बस मधून मग Nature's Nest ह्या आमच्या रेसॉर्ट कडे निघालो. साधारण २ तासांचा प्रवास होता. त्यात मग वाटेत ड्राइवर ला पोलिसांनी थांबवणे (आणि त्याच्याकडे गाडीचे सर्व पेपर नसणे) वगैरे तुरळक अडथळे आलेच. पण प्रवास तसा चांगलाच झाला. रेसॉर्ट मधे शिरताच अगदी निसर्गाच्या जवळ आल्याची जाणीव झाली. मात्र रूम्स  बघीतल्यावर ही जाणीव जरा जास्तच तिव्र झाली (म्हणजे तिथे छोटे किडे, मुंग्या बर्‍यापैकी सराईत पणे वावरत होत्या, बाथरूम मधे गरम पाण्याची सोय नव्हती, वगैरे वगैरे). असो, पण बाहेर निसर्गाची उधळण होती. शेकड्याने उडणारे सन-बर्ड्स, फुलपाखरे, झाडे, पाने, फुले आणि थोडी पावसाळी हवा.

रिसॉर्ट - मागे एका रूम चं छप्पर आणि अर्थातच मी

Common Area for meals & tea (and Slideshow too)

पोहोचे पर्यंत जेवणाची वेळ झालीच होती (खर तर थोडा उशीरच), त्यामुळे फक्त बॅग्स रूम मधे टाकून लगेच जेवणासाठी रांग लावली (इथे फार काही कल्पनाशक्ती वापरु नका, रांग म्हणजे बुफे जेवण). जेवण गोवन पद्धतीचे होते आणि छान होते. विशेषतः मासहारी लोकांसाठी (त्या category त मी  सोडून इतर सर्वच होते म्हणा).

असं ठरलं कि साधारण ४ वाजता आपण ट्रेल साठी बाहेर पडू, म्हणजे अजून एखादा तास होता मध्ये. त्यात वामकुक्षी घेण्यापेक्षा मी रिसॉर्ट च्या आवारात फोटो साठी बाहेर पडलो. मग तिथेच फुल-पाखरे, बुलबुल ह्यांचे फोटो काढता काढता अचानक मला एक वेगळा पक्षी दिसला. चोचीवरून कुठलातरी बार्बेट असावा असं अंदाज येत होता. जाणकारांनी नंतर तो Brown Headed Barbet आहे असं सांगितलंही.

(हा फोटो दुसऱ्या दिवशी काढलेला आहे पण संदर्भासाठी इथेच दाखवला आहे.)

 ४ वाजता सर्व जण तयार होऊन पहिल्या ट्रेल साठी निघालो. मॅक्रो च असल्यामुळे झूम लेन्स ची गरज नव्हती. त्यामुळे कॅमेरा, फ्लॅश आणि एक छोटी सॅक घेऊन निघालो. अर्थातच दीपाने तिचा कॅमेरा हि बरोबर घेतला होता.
आजच टार्गेट होत एक जवळचच माळरान, त्यामुळे चालतच तिथे निघालो. वाटेत मग signature स्पायडर आणि इतर काही मॅक्रो फोटोस मिळाले. माळरानावर पोहोचताच एक्स्पर्ट लोकांची शोधाशोध सुरु झाली, त्यांची तीक्ष्ण नजर चहूकडे होती.

Signature Spider

माळरान

माळरान


थोड्याच वेळात काही विंचू दिसले. त्यातला एक विशेष होता. त्या विंचवाच्या पाठीवर पिल्ले होती खूप सगळी (म्हणतात ना: विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर). मग लगेचच सगळे मॅक्रो फोटोग्राफेर्स कॅमेरे काढून तयार. अर्थात २-३ विंचू होते त्यामुळे सर्वांना हवे तसे फोटोस मिळाले पटकन.
विंचू - पाठीवरील पिल्लांसहित

आजूबाजूच्या परिसरात मिसळून गेलेला

साधारण अर्धा तास ह्यात गेल्यावर मग बाकी शोधाशोध चालू झाली, साप-सुरळी (skink) नेही ओझरते दर्शन दिले. पण थोड्याच वेळात दिवसाचा highlight मिळाला. चक्क एक फुरसे (Saw Scaled Viper) शोधले आमच्या गाईड ने. मग काय, नुसता फोटोंचा पाऊस पडला तिथे. शरीराची गुंडाळी करून तो साप आपल्या आक्रमक स्वभावाचेही दर्शन घडवत होता अधून-मधून. त्याच्या खवले वाल्या कातडी-द्वारे एक विशेष आवाज करून. एवढा छोटा साप पण आवाज अगदी स्पेशल होता. आमच्यातले धाडसी फोटोग्राफेर्स तिथेही पूर्ण आडवे झोपून हवा तो अँगल मिळवण्याच्या प्रयत्नात होते. खरतर हे थोडं धोकादायकच, पण त्यातल्या त्यात सावधान राहून अन्वय आणि इतरांचे प्रयत्न चालू होते. अगदी संध्याकाळ होई पर्यंत हा विषय पुरला आम्हाला.




Saw scaled Viper
परतीच्या प्रवासात मग छोट्या-मोठ्या मॅक्रो टार्गेट्स कडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. तिथून परत रिसॉर्ट ला आलो आणि मग चहा-बिस्किटांचा चा पाहुणचार घेतला. 

त्या-नंतर मग खऱ्या-अर्थाने रूम वर गेलो. गरम पाण्यासाठी बॉयलर चालू केला होता खरा, पण गरम पाणी काही मिळाले नाही. मग तशाच थोड्याश्या गरम भासणाऱ्या पाण्याने अंघोळी उरकून परत सगळे जमले slideshow बघण्यासाठी. युवराज ने त्याचे काही विशेष फोटो वापरून सर्वांना मॅक्रो फोटोग्राफी कशी करावी हे दाखवले आणि त्याच-बरोबर आपण पुढच्या २-३ दिवसात आजून काय-काय बघू शकू (फोटोस च्या दृष्टीने) हि हि कल्पना दिली.

तोपर्यंत ८/८:३० झालेच होते त्यामुळे तिथेच मग छान गोवन जेवणाचा आस्वाद घेतला सर्वांनी. रिसॉर्ट च्या स्वीट-डिश बरोबर मकरंद ने पुरणपोळी सुद्धा आणली होती. त्यामुळे जेवण अगदी मस्त झाले.

अर्थात दिवस इथे संपत नव्हता, अजून रात्रीची एक फोटो-राऊंड बाकी होती. मी-दीपा आणि २-३ इतर जण गेलो नाही पण बाकीच्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांनी रात्रीत सुद्धा काही चांगले फोटोस मिळवले तिथे.
आम्ही मात्र लगेच झोपायचे ठरवले.

अर्थात त्याला अजून एक कारण होते, ते म्हणजे slideshow च्या दरम्यान युवराज ने सांगितले कि सकाळी लवकर उठून बाहेर पडलो तर vernal hanging parrot दिसण्याची खूप शक्यता आहे, साधारण उजाडल्यापासून ते पहिला १/१.५ तास पक्षी दिसण्याची खूप शक्यता असते, त्यामुळे गजर लावून सकाळी ५:४५ ला उठायचं नक्की केलं.

२-ऑक्टोबर

ठरल्या प्रमाणे गजर लावून उठलो खरे पण आधी तर नळाला पाणीच नव्हते (पण आले १० मिनिटात - thanks to Yudhi kaka aka Yudhishthir Vaidya) आणि फारसं उजाडलं हि नव्हतं. उजेड नसेल तर पक्षी काय उडेल (म्हणजे दिसेल)?

बाहेर पडून कॉमन एरिया मध्ये गेलो तर चहा तयार होत होता, मग पटकन चहापान करून कॅमेरा गळ्यात लटकावून रिसॉर्ट च्या आवारात भटकंती सुरु केली. आमच्या नशिबी आज फारसे parrots नव्हते, पण अजून २ सकाळी (म्हणजे पुढचे २ दिवस) आहेत असे म्हणत, होणारी निराशा लपवली. अर्थात सनबर्डस खूप होते आणि शिवाय इतर काही पक्षीही दर्शन देत होते (उदा. हॉर्नबिल, बार्बेटस, स्पायडर हंटर, सुतार पक्षी वगैरे). आणि जोडीला खूप सगळी फुल-पाखरे सुद्धा होतीच.

आज एक जरा मोठा ट्रेक करायचा असा प्लॅन होता त्यामुळे ९ पर्यंत निघणे गरजेचे होते. मग ८:३० वाजता ब्रेकफास्ट केला आणि लगेच सगळे तयार..

गोव्यातल्या प्रसिद्ध तांबडी-सुर्ला शिवमंदिरा पासून सुरुवात केली. आधी मिनी-बस मधून तिथं-पर्यंत गेलो. 13 व्या शतकातील हे मंदिर अजून बऱ्याच चांगल्या स्थितीत आहे आणि आजू-बाजूचा परिसर देखील खूप छान आहे. आवारातच मग थोडी मॅक्रो फोटोग्राफी झाली.

तांबडी सुर्ला शिव मंदिर

तांबडी सुर्ला शिव मंदिर

मंदिर परिसरातील फुले

तिथून पुढे मग पाय-वाटेने ट्रेक ला सुरुवात केली. ह्या वर्षीच्या भरपूर पाऊसामुळे वाट बऱ्याच ठिकाणी निसरडी झाली होती, त्यामुळे सांभाळून चालत मग ट्रेक सुरु झाला. नेहमी प्रमाणेच दर ५-१० पाउलांवर काही ना काही मॅक्रो ऑब्जेक्टस मिळताच होते. त्यातले काही ..
कप मशरूम

Purple Crab

False Tiger Moth

वाटेत ३-४ ठिकाणी वाहते पाणी ओलांडून जावे लागत होते, त्यातला एक प्रवाह थोडा खोल होता, त्यामुळे तिथे बूट काढून तो ओढा पार केला. अर्थात जे गमबूट वाले होते त्यांना काहीच प्रश्न आला नाही. मग इथे अगदी अल्प प्रमाणात रक्तदानाचा विधी झाला (म्हणजे माझ्या उजव्या मनगटाला एक जळू लागली, पण वेळीच हे लक्षात आल्याने लगेचच मी तिला खेचून काढण्यात यशस्वी ठरलो), हे बहुदा मी बूट परत घालण्या करता जिथे बसलो होतो, तिथे घडले असावे.
साधारण २,२:३० km गेल्यानंतर एक लहान नदी-प्रवाह दिसला, तिथे थोडे विसावलो त्या दगडांवर. मग तिथे काही ग्रुप फोटोस सुद्धा झाले.


त्यानंतर मग परतीचा प्रवास सुरु केला, ह्या वेळी बस पर्यंत परत यायला एक तास पुरला कारण फोटोसाठीचे ब्रेक्स जरा कमी झाले येताना. अपवाद फक्त एका ठिकाणी ३-४ फुल पाखरे एकत्र दिसली. त्यांचे तिथे मड-पॅडलिंग चालू होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे काय नवीन? तर त्याच थोडं स्पष्टीकरण:

mud-puddling: this is a process typical with butterflies (and also seen in some other insects) wherein they extract fluids (salts and amino acids) from the mud or animal-dung or even the carrion. This behavior is seen predominantly in the male species.

Mud puddling Butterflies

परत येईपर्यंत बहुतेक सर्व जण थोडे दमलेले होते. आणि हो, मगाशी मी उल्लेख केला होता कि ती वाट घसरडी होती, तर त्याच झालं असं कि आमच्यापैकी ४ जण घसरले कि वाटेत (एक कॅमेरा सुद्धा तात्पुरता निकामी झाला, त्याला पाणी लागल्या मुळे, पण २ दिवसानंतर झाला चालू आपोआप), आणि अस्मादिकांचा हि नंबर होता कि त्यात. पण तशी दुखापत वगैरे झाली नाही नशिबाने कोणालाच. आणि आधीच क्लिअर करतो, तो नादुरुस्त कॅमेरा माझा नव्हता.

तर दमून परत आल्यावर समोरच  लिंबू सरबत वाला दिसला, त्यामुळे तिथे एक छोटा ब्रेक अपरिहार्य होता. मग तिथेही १-२ फुलपाखरे दिसली (आणि काही माकडे सुद्धा). आम्ही इथे सकाळी पोहोचलो तेव्हा फक्त आमचीच गाडी होती, पण आता तिथे लोकांची खूप गर्दी दिसत होती.

तिथून निघालो आणि मग रिसॉर्ट वर येऊन late लंच झाला. आता युवराज/मकरंद ने थोडा वेळ फ्री दिला होता कारण पुढचा दौरा ४ वाजता होता.  परत एकदा आम्ही झोपे ऐवजी रिसॉर्ट मध्ये बर्ड फोटोग्राफी च करायचं ठरवलं.

आज मला एका हॉर्नबिल चाही फोटो मिळाला आणि एक सुतार पक्षी. चला, म्हणजे झोप न काढून काही बिझडलं नाही.


चोच फांदीवर घासणारा हॉर्नबिल

सुतारपक्षी
     
संध्याकाळचा दौरा तसा हलका होता, कारण आम्ही जीप ride केली होती अभयारण्यात जाण्यासाठी. इथे फोटोस पेक्षा निसर्ग सौंदर्य बघण्यावर भर होता. वाटेत काही गौर (जंगली रेडे) दिसले, काही शिकारी पक्षी दिसले. मग पुढे थोडं अंतर पायी चाललो, हाच रस्ता पुढे दूधसागर धबधब्यापर्यंत जात होता पण आमच्याकडे तेवढा वेळ नसल्याने त्याचा विचार केला नाही.

परत आल्यावर (साधारण ६:३०/७ वाजता) चहा biscuits घेऊन, ८:३० वाजता डिनर साठी भेटायचे ठरले. रूम वर पोहोचलो आणि लगेचच जोरदार पाऊस सुरु झाला (नशीब आधी पडला नाही, कारण आमच्या २ जीप्स पैकी एक ओपन होती (छपराशिवाय). खोलीच्या पत्र्यावर पाऊस जोरदार वाजत होता. मग तिथे lights गेले २-३ वेळा (अर्थात generator होता त्यांचा) .

पाऊस काही रात्री पर्यंत कमी झाला नाही. रूम ते कॉमन-एरिया हे अंतर सुद्धा साचलेल्या पाण्यातून जावे लागले (हेड-टॉर्च घेऊन) . ह्या वेळेपर्यंत हे माहित झालं होत कि आपल्या आसपास सुद्धा बरेच साप आणि विंचू मुक्तपणे वावरत असतात, त्यामुळे ती एक जास्तीची भीती मनात ठेऊनच पाण्यातून जावे लागले. पण हि भीती सोडली तर त्या पाऊस, पाण्यातून जाण्यातही खूप मजा आली. आजूबाजूचा किर्र काळोख, त्यात जाणवणारी झाडे, सतत ओरडणारे रातकिडे, पडणारा पाऊस, मोबाइलला नसणारी रेंज .. काय अनुभवायचा आहे निसर्ग तो अनुभवून घ्या इथे.

जेवणानंतर लगेचच परत येऊन बेड वर आडवे होण्याची मजा काही वेगळीच (विशेषतः दिवसभरच्या दगदगीनंतर). अर्थातच मी रात्रीच्या trail ला गेलो नाही. पण त्या पावसात सुद्धा युवराज गुरुजी आणि काही चेले बाहेर पडलेच. 

{to be continued ..... }